बीड – जिल्ह्यात ग्रामसेवकाचा लाच घेताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तर पदाचा गैरवापर करून शेतकऱ्यांची अडवणूक केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. राज्यात सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील सर्वसामान्य, गोरगरिब शेतकऱ्यांना कशा प्रकारे आर्थिक पिळवणुकीला सामोरे जावे लागते, याचे चित्र समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासकामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात असताना, बीड जिल्ह्यातील स्थानिक स्तरावर मात्र मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचे उघड झाले आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील वाघोरा येथील ग्रामसेवकाने शेतकर्याकडून उघडपणे पैसे स्वीकारताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शेतकर्याच्या शेतातील फळबाग लागवडीचे मस्टर काढण्यासाठी या ग्रामसेवकाने पैशांची मागणी केल्याचा आरोप तक्रारदार शेतकऱ्याने केला आहे. वाघोरा गावचे ग्रामसेवक शुभम माने यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये वाघोरा गावचे ग्रामसेवक शुभम माने हे ग्रामपंचायत कार्यालयात आपल्या खुर्चीवर बसून एका व्यक्तीकडून काही पैसे स्वीकारताना स्पष्ट दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यात सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कशा प्रकारे आर्थिक पिळवणुकीला सामोरे जावे लागते हे दिसत आहे. ग्रामसेवकावर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या प्रकरणी कोंडीबा लोंढे या पीडित शेतकऱ्याने बीड जिल्ह्यातील माजलगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणात शेतकरी कोंडिबा लोंढे यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेतातील फळबाग लागवडीचे मस्टर काढण्यासाठी ग्रामसेवकाने पैशांची मागणी केली होती. शेतकरी कोंडिबा लोंढे यांनी पैसे देताना त्यांनी हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे. आता या प्रकरणात शेतकरी कोंडिबा लोंढे यांनी व्हिडिओ पुराव्यासह त्यांनी लाच मागणार्या ग्रामसेवकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्यातील ग्रामीण भागात रोजगार हमी योजना सारख्या योजनांमधून मजुरी आणि अनुदान मिळवण्यासाठी ग्रामसेवकाची भूमिका महत्त्वाची असते.
मात्र, याच ग्रामसेवक पदाचा गैरवापर करून राज्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची पैसे मागून अडवणूक केली जात असल्याचा प्रकार आता उघड झाला आहे. या प्रकरणी स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. आता बीड जिल्ह्यातील या व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन बीड जिल्ह्यातील माजलगाव पंचायत समिती प्रशासन हे ग्रामसेवक शुभम माने यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार का? हा प्रश्न नागरिक विचारत आहेत. बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत कार्यालयातच ग्रामसेवकाचा लाच घेताना व्हिडिओ व्हायरल झाल्यामूळे राज्यातील सरकारी खात्यांतील भ्रष्टाचार समोर आला आहे.





