झारखंड – सिंगरौली जिल्ह्यातील बंधौरा येथील अदानी पॉवर प्लांटमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. लल्लन सिंग असे मृतकाचे नाव असून तो झारखंडच्या गरवा जिल्ह्यातील रहिवासी आहे. लल्लन सिंग यांच्या मृत्यूमुळे कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर संतप्त कामगारांनी पॉवर प्लांटच्या कार्यालयाला आग लावून अनेक वाहनांची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वायरच्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री प्लांटमध्ये काम करत असताना त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि नंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर, कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचा आणि कंपनी व्यवस्थापन ही घटना दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करण्यात आला. यानंतर संतप्त कामगारांनी धुमाकूळ घातला, पोलिसांच्या वाहनांसह सुमारे अर्धा डझन वाहनांचे नुकसान केले आणि प्लांटच्या एका भागाला आग लावली.
शनिवारी, इतर कामगारांनी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केले, ज्याला लवकरच हिंसक वळण लागले. आंदोलकांनी परिसराची तोडफोड करण्यास सुरुवात केली. १० हून अधिक वाहनांचे नुकसान झाले, २५ हून अधिक एअर कंडिशनर तोडण्यात आले आणि कंपनीच्या एका कार्यालयाला आग लावण्यात आली. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा संतप्त कामगारांनी पोलिसांच्या जीपचेही नुकसान केले.
‘दैनिक भास्कर’ च्या वृत्तानुसार, प्लांटमध्ये सुमारे पाच तास गोंधळाचे वातावरण होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी, एसडीएम, तहसीलदार आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यासह २०० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. सध्या कारखान्यातील परिस्थिती सामान्य आहे. सुरक्षेसाठी पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. तर ४०० हून अधिक कामगार आपापल्या गावी रवाना झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात अद्याप कोणताही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. तोडफोड करणार्यांची व्हिडिओग्राफीद्वारे ओळख करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की कामगाराचा मृत्यू त्याच्या राहत्या घरी झाला. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका आहे, मात्र शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही. कामगाराच्या मृत्यूच्या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल. तर मृताच्या कुटुंबाला योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी आणि जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे.





