सोलापूर – जिल्ह्यात शाळेमधून दहावीच्या भूगोलाच्या पेपरच्या ५० प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात पेपर चोरी प्रकरण घडले आहे. भूगोलाचा अभ्यास झाला नसल्याने एका मुलाने पेपरचीच चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणात सांगोला पोलिसांनी एकाला पकडले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील सांगोला विद्यामंदिर शाळेमधून 2 दिवसापूर्वी दहावीच्या भूगोलाच्या पेपरच्या ५० प्रश्नपत्रिका चोरीला गेल्या होत्या.
अखेर या भुगोलाच्या पेपरच्या ५० प्रश्नपत्रिका सांगोला पोलिसांना मिळाल्या आहेत. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाची चौकशी केली आहे. तपासात हा सर्व प्रकार उघड झाला आहे. हे कृत्य करणारा विद्यार्थी दहावीत शिकत आहे. तर सांगोला येथील दहावीच्या परिक्षा केंद्रावर त्याचा नंबर होता. दहावीच्या भूगोलाच्या पेपरला हा विद्यार्थी आला होता. मात्र, पेपर सुटल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर त्याने या सर्व प्रकार केल्याची कबुली दिली आहे.
इतर पेपर चांगले गेले, मात्र भूगोलाचा अभ्यास झाला नसल्याने पेपर चोरल्याची कबुली दहावीच्या विद्याथ्याने दिली आहे. सांगोला पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची त्याच्या पालकांसमोर चौकशी केली आहे. तेव्हा त्याने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चोरी करण्यापूर्वी त्याने या केंद्रावरील परिक्षा रूमची चांगली पाहणी करुन घेतली होती. पहाटे हा मुलगा इलेक्ट्रिक बाइक वर इलेक्ट्रिक कटर घेऊन शाळेत पोहोचला. त्यानंतर त्याने या रूमला लावलेले कुलूप कटरच्या साह्याने कट केले आणि आत जाऊन प्रश्नपत्रिका असलेली ट्रंक उघडली आहे.
त्याने भूगोलाच्या प्रश्नपत्रिका असलेले दोन गट्ठे आणि तीन कोऱ्या उत्तर पत्रिका आपल्या सोबत घेऊन तेथून तो पुन्हा घरी आला. यातील एक गट्ठा फोडून त्याने ती प्रश्नपत्रिका पाहिली होती. सांगोला पोलिसांनी या अल्पवयीन मूलाकडून चोरीला गेलेल्या 50 प्रश्नपत्रिका 3 कोऱ्या उत्तर पत्रिका इलेक्ट्रिक कटर आणि इलेक्ट्रिक बाइक ताब्यात घेतली आहे. या प्रश्नपत्रिका चोरी नंतर राज्यातील शिक्षणक्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेपर होणार का? हा प्रश्न असताना पेपर वेळापत्रकाप्रमाणे घेण्याचा निर्णय दहावीच्या बोर्डाने घेतला होता. त्यानुसार राज्यात सर्व ठिकाणी दहावीचा शेवटचा हा भूगोलाचा पेपर घेण्यात आला आहे. पेपर चोरणाऱ्या या मुलाने या प्रश्नपत्रिकेचा गैरवापर केला नसल्याची खात्रीही पोलिसांनी चौकशी करून घेतली आहे. आता नियमानुसार या अल्पवयीन मुलास न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. या प्रकरणात अधिक तपास सांगोला पोलिस करत आहेत.





