मुंबई – केवळ राजीनामा पुरेसा नसून, रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी झाली पाहिजे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे, त्याचबरोबर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेत्यांचे अशोक खरात सोबतचे फोटो समोर आले आहेत. याप्रकरणावरून रूपाली चाकणकरांवर मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले आहेत.
यानंतर काल चाकणकरांनी आपल्या राज्य महिला आयोगाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांनी त्या पदावरती असताना काही प्रकरण दाबली आहेत का?याबाबतची देखील चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, काल रुपाली चाकणकारांनी राजीनामा दिला. महिला आयोग महिलांच्या न्यायासाठी असतात. पण यांचे अध्यक्ष पद खरात सारख्या माणसाला आधार देण्यात गेले.
माझ्याकडे महिलांच्या ५ ते ६ केसेस आल्या आहेत. काल सुनील तटकरे संतापून पळून गेले आहेत. पण तुम्ही किती ही पळणार, मी सोडणार नाही, असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ही स्त्री म्हणून राज्यात गेले ३ दिवस हा सगळा प्रकार घडताना त्या बघत होत्या, पण त्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. महाराष्ट्रातील पहिली महिला उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी अनेक गोष्टी करणे अपेक्षित होते. पण 3 दिवसांनी सगळ्यांनीच पत्रकार परिषदा घेतल्या, त्यानंतर सरकारने चाकणकरांचा राजीनामा स्वीकारला.
पण तो राजीनामा स्वीकारतानासुद्धा जे दिसले ते म्हणजे सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता, पण रुपाली चाकणकर या तर जसे मॉडेलिंगसाठी उभे राहतात, तशी पोझ देतानाचा फोटो होता. आणि त्यानंतरचं त्यांचं बोलणे ऐकले तर त्यात कुठेही खेद, विनम्रता नव्हती, एक अहंकार होता. अशा शब्दांत अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकरांवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर यांच्यावर ही अंजली दमानिया यांनी टीका केली आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर तटकरे तिथून पळून गेले आहेत. ते घाबरलेले दिसत होते. तुम्ही कितीही पळा, पण आता आम्ही तुम्हाला आणि त्यांना सोडणार नाही, असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे.
केवळ राजीनामा पुरेसा नसून, रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी झाली पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्षा या संविधानिक पदावर असताना त्यांनी अशोक भोंदूबाबा अशोक खरातविरुद्धच्या केसेस दाबल्या असतील, तर त्यावर कडक कारवाई व्हायला हवी. भोंदूबाबा अशोक खरातकडे जे जे राजकारणी जात होते, त्या सर्वांची नावे जाहीर झाली पाहिजेत, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. भोंदूबाबा अशोक खरात या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाची मोठी घाण केली आहे. आता हे राजकारण पूर्णपणे साफ करण्याची वेळ आली आहे, असे दमानिया यांनी म्हटले आहे.
अंजली दमानिया यांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व बड्या व्यक्तींचे चेहरे समोर आणण्यासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यास राज्य सरकारने खूप उशीर केला आहे. राज्यात हुंडाबळीची आणि महिला अत्याचाराची गंभीर प्रकरणे समोर आली असतानाच, त्यांचा राजीनामा घेणे अपेक्षित होते. राज्यात वैष्णवी हगवणे, संपदा मुंडे आणि गौरी गर्जे यांसारख्या गंभीर प्रकरणांमध्ये महिला आयोगाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. पडद्यामागे अशा अनेक तक्रारी राज्य महिला आयोगाकडे येतात, पण राज्यातील महिला आयोग त्यावर काहीही करत नाही.
राज्यातील महिला आयोगावर बसलेल्या लोकांना केवळ राजकारण करण्यात आणि मिरवण्यात रस असतो, त्यांना राज्यातील पीडित महिलांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसते, अशी टीका अंजली दमानिया यांनी केली आहे. यापुढे राज्यातील महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणत्याही राजकीय व्यक्तीची नियुक्ती करू नका. राजकारण आणि राज्यातील महिला आयोग या दोन गोष्टी एकमेकांपासून लांब ठेवाव्यात. महाराष्ट्रातील महिलांना खरोखर न्याय मिळवून द्यायचा असेल, तर यापुढे राज्यातील महिला आयोगाच्या अध्यक्षपदी एखादी महिला आयपीएस अधिकारी किंवा निवृत्त न्यायाधीश यांचीच नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.





