मुंबई – नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटीच्या हेल्पलाईनवर 100 हून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अघोरी पूजा आणि महिलांच्या शोषणाच्या आरोपांमुळे या प्रकरणात आता महत्वाचे खुलासे बाहेर येत आहेत. तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर अवघ्या काही दिवसांत खुप तक्रारी आल्या आहेत.
नाशिकच्या भोंदू अशोक खरातने महिलांचाच नाही तर राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनाही कोट्यावधीं रूपयांना लुटल्याची माहिती उघडकीस आली आहे. एसआयटीने माहिती गोळा करण्यासाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनवर आतापर्यंत १०० हून अधिक फोन कॉल्स आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे. अशोक खरात प्रकरणात अनेक महिलांनी स्वतः पुढे येत खरातकडून झालेल्या अत्याचार आणि फसवणुकीबाबत खरी माहिती दिली आहे.
या तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, भोंदू अशोक खरातने रत्ने आणि मौल्यवान खडे देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात नागरिकांची आर्थिक फसवणूक केली आहे. बाजारात ५० रुपयांना मिळणारे खडे चमत्कारी असल्याचे सांगून ते १ ते २ लाखांना विकले आहे. अशाच प्रकारे या भोंदू अशोक खरातने हजारो लोकांची लाखो रूपयांची फसवणुक केल्याची माहिती आता समोर येत आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात सामान्य नागरिकच नाही, तर राज्यातील अनेक मोठे राजकीय नेते आणि सेलिब्रिटी लोकही अडकले होते.
राजकीय यश आणि भविष्यातील संकट टाळण्यासाठी अनेक जण भोंदूबाबा अशोक खरातकडे जात असल्याची माहिती मिळाली आहे. लोकांचे भविष्य सांगणे आणि विशेष अघोरी पूजा विधी यांच्या नावाखाली खरातने लोकांकडून मोठ्या रक्कम घेऊन उकळपट्टी केली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात अनेक महिलांनी तक्रारी केल्या आहेत. महिलांची आर्थिक फसवणुकीसोबतच अनेक महिलांनी शारीरिक शोषणाच्या तक्रारी केल्यामुळे भोंदूबाबा खरातच्या अडचणी अधिकच वाढत चालल्या आहेत.
अघोरी पूजा आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली अनेक महिलांवर अत्याचार केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अनेक महिलांनी भोंदू अशोक खरातवर गंभीर आरोप केले आहेत. नाशिक पोलिस आता या महिलांच्या तक्रारींवर आधारित ठोस पुरावे गोळा करत आहेत. या नाशिक जिल्ह्यातील भोंदू अशोक खरातच्या संपूर्ण प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलिसांचा तपास जसा पुढे सरकत आहे, तशी नवीन धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. याप्रकरणात अधिक तपास नाशिक पोलिस करत आहेत.





