अटकेची कुणकुण लागताच अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार; शिर्डी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल

SHARE:

नाशिक – शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केलेल्या अशोक खरात प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात बाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. कल्पना खरात विरोधात शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर एसआयटीचे पथक खरातच्या घरी गेले असता पत्नी कल्पना फरार झाली आहे. त्यामुळे घरी असलेला खरातचा मुलगा हर्षवर्धन याला एसआयटीने ताब्यात घेतले आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अटक करणार या भीतीमुळे कल्पना खरात फरार झाल्याची माहिती आहे.

अशोक खरात याच्यावर केवळ लैंगिक शोषणाचेच नाही, तर जमिनीच्या फसवणुकीचेही गंभीर आरोप आहेत. शिर्डी येथील ५ एकर जमिनीच्या खरेदीत फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना आणि इतर 5 जणांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जमिन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या तक्रारीनुसार, कर्ज फेडण्याच्या बहाण्याने व्याजाने पैसे देऊन जमीन हडपल्याचा आरोप आहे. दरम्यान, शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाल्यावर खरातची पत्नी फरार झाल्याची माहिती आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोन आरोपींना राहाता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदाराला सावकारीच्या नात्याने पैसे दिले होते? एक मोठा व्याजदराने पैसे दिले होते? आणि त्याच्या बदल्यात जमिनीची खरेदी करून घेतली आहे? या प्रकरणाचा शिर्डी पोलीस बारकाईने तपास करत आहे.

दुसरीकडे अशोक खरात याच्या मुलीबाबतही मोठी माहिती समोर आली आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यातील मॉडेल कॉलनीतील आलिशान इमारतीत ३  बीएचके फ्लॅट आहे. २४ रत्नम नावाच्या आलिशान सोसायटीत सातव्या मजल्यावर हा फ्लॅट आहे. २०२३ मध्ये हा फ्लॅट खरेदी करण्यात आला होता. हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी खरातने चेकने व्यवहार न करता संबंधित बिल्डरला १  कोटी २० लाख रूपये रोख रक्कम दिली होती. पुण्यातील सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीत त्याचे घर असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

स्वतःचे वार्षिक उत्पन्न केवळ १२ लाख रुपये दाखवून आयकर भरणारा अशोक खरात प्रत्यक्षात शेकडो कोटींच्या संपत्तीचा मालक असल्याचे उघड झाले आहे. त्याच्या विविध कंपन्या, बांधकाम प्रकल्प आणि हार्डवेअर व्यवसायात मोठ्या प्रमाणावर जीएसटी बुडवल्याचा संशय आयकर विभागाला आहे. याप्रकरणी खरातच्या सीएची आणि त्याची समोरासमोर चौकशी केली जाणार असून लवकरच आयकर विभागाकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

अशोक खरातवर लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि जमीन बळकावल्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची पोलीस कोठडी आज संपत असल्याने त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. तक्रारींचा पाऊस आणि गुन्ह्यांची वाढती साखळी पाहता एसआयटी त्याची कोठडी वाढवून मागण्याची दाट शक्यता आहे. भोंदूगिरीच्या आडून उभारलेले हे साम्राज्य आता कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे.

अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणार्या भोंदबाबा अशोक खरातचे रोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत. त्याच्याविरोधात १० गुन्हे दाखल असून तक्रारींचा ओघ सुरूच आहे. दरम्यान शिर्डी जमीन खरेदी कथित फसवणूक प्रकरणातही खरात आणि त्याच्या पत्नीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोघांनाही आरोपी करण्यात आले आहे. अशोक खरात याच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे राजकीय नेत्यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण कि खरातकडे ३९ आमदारांच्या रांगा लागत होत्या, असा खुलासा एका आमदारने केला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा