कानपूर – शहरातील कल्याणपूर परिसरात चालणाऱ्या एका भयानक किडनी प्रत्यारोपण रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाचं डॉक्टरांसह एका आठवी पास रुग्णवाहिका चालकाला अटक केली आहे. डॉ. प्रीती आहुजा, त्यांचे पती डॉ. सुरजीत आहुजा, डॉ. राजेश कुमार, डॉ. राम प्रकाश, डॉ. नरेंद्र सिंग आणि एजंट शिवम अग्रवाल अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. किडनी दाता आणि दलाल यांच्यात पैशांवरून वाद निर्माण झाल्यावर हे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले.
तपासात असे उघड झाले की, लखनौ आणि दिल्लीहून डॉक्टरांची पथके किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी येत असत. देशभरातील विविध राज्यांतील तरुणांना जाळ्यात अडकवून किडनीच्या व्यापारात ओढले जात होते. पोलीस आयुक्त रघुबीर लाल यांच्या म्हणण्यानुसार, या टोळीने आतापर्यंत ४० ते ५० बेकायदेशीर प्रत्यारोपण केले असून, त्यांचे जाळे लखनौ आणि दिल्लीपासून नेपाळ आणि दक्षिण आफ्रिकेपर्यंत पसरलेले आहे.
पोलीस आयुक्तांनी संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करताना सांगितले की, मूळचा बिहारचा असलेल्या शिवमने एमबीएच्या चौथ्या सत्रातील एका विद्यार्थ्याला ६ लाख रुपयांच्या मोबदल्यात किडनी दान करण्यास तयार केले. त्यानंतर ही किडनी मेरठचे रहिवासी पारुल तोमर यांना दान करण्यात आली. पोलीस तपासादरम्यान, आयुषची बनावट खाती देखील सापडली, ज्यातून सायबर गुन्हेगारीतील त्याचा सहभाग उघड झाला. पोलीस आयुक्त रघुबीर लाल यांनी सांगितले की ३ मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेची रहिवासी असलेल्या अरेबिकावरही आहुजा रुग्णालयात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. ही संपूर्ण टोळी पद्धतशीरपणे काम करत होती.
या टोळीचा एजंट, शिवम अग्रवाल हा आठवी पास असून रुग्णवाहिका चालक आहे. तो लोकांना फसवण्यासाठी गळ्यात स्टेथोस्कोप घालून फिरत असे. शिवम हा आहुजा रुग्णालयातील फरार डॉ. रोहित उर्फ राहुल, डॉ. प्रीती आहुजा आणि डॉ. सुरजीत आहुजा यांच्या संपर्कात होता. डॉ. प्रीती या मेडिसिनमध्ये एमडी आहेत, तर डॉ. सुरजीत हे पॅथॉलॉजीमध्ये एमडी आहेत. पोलीस आयुक्तांनी सांगितले की ३० वर्षीय पारुल तोमर यांचे दोन्ही मूत्रपिंड खराब झाले असून, त्या सुमारे आठ वर्षांपासून डायलिसिसवर आहेत.
या टोळीने अशा व्यक्तींना लक्ष्य करून त्यांना किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी फसवले. हे संपूर्ण सिंडिकेट एका टेलिग्राम ग्रुपद्वारे कार्यरत होते. फरार डॉक्टर अफझलने पारुलला प्रत्यारोपण करण्यास सांगितले होते. यानंतर, कल्याणपूरचा रहिवासी असलेल्या शिवम अग्रवालने, मूळचा बिहारचा आणि डेहराडूनचा एमबीए पदवीधर असलेल्या आयुषला ६ लाख रुपयांच्या मोबदल्यात किडनी प्रत्यारोपण करण्यास तयार केले.
प्रत्यारोपणानंतर शिवमला ७ लाख रुपये देण्यात आले, त्यापैकी त्याने ३.५० लाख रुपये आयुषच्या खात्यात जमा केले, २.७५ लाख रुपये आहुजा हॉस्पिटलला दिले, उपचारासाठी मेड लाईफ हॉस्पिटलला २५ हजार रुपये दिले आणि ५० हजार रुपये स्वतःकडे ठेवले.
या प्रकरणात डॉ. रोहित उर्फ राहुल याचे नाव समोर आले आहे. हा डॉक्टर आपल्या संपूर्ण टीमसोबत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करत असे. या दिवसी रुग्णालयातील नियमित कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जात असे. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कोणतीही फाईल तयार केली जात नव्हती. जेणेकरून कोणताही पुरावा उरणार नाही. आरोपीवर मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ आणि बीएनएसच्या कलम १४३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या खुलाशामुळे उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाच्या देखरेख यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.





