नांदेड – मुस्लिमांविरोधात गरळ ओकून दोन समूहात तेढ निर्माण करणारे पूर्व भाजप नेते आणि तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह यांनी पुन्हा एकदा मुस्लिमांविरोधात विवादित वक्तव्य केलं आहे. राज्यातील अनधिकृत मदरशांवर बुलडोझर फिरवला पाहिजे, असं वादग्रस्त वक्तव्य आमदार टी. राजा सिंह यांनी शनिवारी रात्री नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे केलं. त्यांच्या या वक्तव्याने वाद निर्माण झाला असून बिलोली पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टी. राजा सिंह पुढे म्हणाले म्हणाले कि नितेश राणेंनी मदरशांविषयी केलेल्या विधानाला माझे समर्थन आहे. महाराष्ट्रातील सर्वच मदरसे बंद करा. या मदरशांमध्ये देशविघातक शिक्षण दिले जाते. नितेश राणेंना माझे निवेदन आहे की, त्यांनी हे अनधिकृत मदरसे बंद करण्याऐवजी कायमचे उद्ध्वस्त करावेत. मदरसे केवळ बंद केले तर ते पुन्हा चालू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मदरशांवर थेट बुलडोझर चालवा, अशी वादग्रस्त मागणी त्यांनी केली.
इतकेच नाही तर आमदार टी. राजा सिंह यांनी औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी देखील केली. ते म्हणाले कि संभाजीनगरमध्ये औरंगजेबची कबर हटवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भीती वाटतं आहे का? तुम्हाला भीती वाटते कि मुस्लिमांचे मतदान मिळणार नाही. ते तुम्हाला मतदान करणार नाही, हे लिहून घ्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांना औरंगजेबची कबर उखडून तिथे शौचालय बांधण्याची मागणी केली. औरंग्याची कबर महाराष्ट्रासाठी नको आहे. ती कबर उखडवण्यासाठी मावळे हवे असतील तर लाखोंच्या संख्येने येऊ, असंही ते म्हणाले.
धर्मासाठी लढणाऱ्यांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. जिथे मदत लागेल, तिथे आमचे लोकं मदत करतील. देशद्रोही हल्ला करण्यासाठी आले तर त्यांना गोळी मारण्यासारखे हत्यार असले पाहिजेत, एका एका घरात पाच पाच बंदूका असल्या पाहिजे, देशद्रोही हल्ला करण्यासाठी आले, त्यांना गोळी मारण्यासारखे हत्यार आपल्याकडे राहिले पाहिजे, यासाठी घरात शस्त्र ठेवा. देवाच्या गाभाऱ्यात शस्त्र ठेवणे कायदेशीर आहे, असे चिथावणीखोर वक्तव्य टी राजा सिंह यांनी केले आहे.
या वादग्रस्त वक्तव्यानंतर टी राजा यांच्या विधानाविरोधात बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्याच्या कलम १६८ नुसार टी राजाला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील याचिका क्रमांक ४०१ /२०२६ नुसार २८ मार्च २०२६ रोजी बिलोली इथं सभा घेण्यास अटी व शर्तींवर परवानगी देण्यात आली होती. पण या सभेतील भाषण पाहता टी राजा यांनी शांतता, धार्मिक सौहार्दाचे उल्लंघन केल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. नोटीस बजावल्यानंतर निर्धारीत वेळेत पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
काहीच दिवसांपूर्वी नागपूरमध्ये नमाज पठणाच्या वादावर भाष्य करताना नितेश राणे यांनी थेट राज्यातील मदरशांना टार्गेट केलं होतं. तसेच भारतात धर्मनिरपेक्ष नावाची कोणतीही गोष्ट नाही. असे म्हणत मदरशात शिक्षण घेऊन कुणी डॉक्टर किंवा इंजिनिअर झालं का? मदरसे हे दहशतवाद्यांचे अड्डे असून मुख्यमंत्र्यांना भेटून सर्व मदरसे बंद करायला सांगणार असल्याचं वक्तव्य केलं त्यांनी होते. ज्यानंतर या वक्तव्यावरून राज्यात वादाला तोंड फुटले होते. यानंतर टी. राजा सिंह यांनी हे विवादित वक्तव्य केलं आहे.
टी. राजा सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तीव्र राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विरोधी पक्षांनी आणि विविध संघटनांनी याला समाजातील तणावाचे कारण ठरवत आक्षेप घेतला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी अशा संवेदनशील विषयांवर संतुलित आणि जबाबदार वक्तव्ये करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.





