अशोक खरात प्रकरणात समता पतसंस्थेतील खात्यांसदर्भात प्रतिभा चाकणकरांची शिर्डी पोलिस चौकशी करणार; कोट्यावधींच्या व्यवहार प्रकरणाची चौकशी होणार असल्याची माहिती

SHARE:

अहिल्यानगर – भोंदू अशोक खरात प्रकरणात समता पतसंस्थेतील खात्यांसदर्भात प्रतिभा चाकणकरांची शिर्डी पोलिस चौकशी करणार आहेत. भोंदू अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकरांची लवकरच चौकशी होणार आहे व शिर्डी पोलिस कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. कोट्यावधींच्या व्यवहार प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. भोंदूबाबा अशोक खरातशी राजकीय संबंध असल्याच्या कारणावरुन रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अशोक खरातला एसआयटीने पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले होते, यावेळी न्यायालयाने अशोक खरातला आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अशोक खरातवर एकूण १२ गुन्हे दाखल झाले आहेत. एसआयटीने न्यायालयातून तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेतला आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल आहे. एका ७ महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप खरातवर आहे. प्रसूती सुरळीत व्हावी आणि मुलगाच होईल, असे आमिष दाखवत त्याने महिलेवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अशोक खरातची चौकशी सुरू असताना अशोक खरातशी संबंधित राजकीय व इतर लोकांनाही अहिल्यानगर व नाशिक पोलिसांनी नोटीस दिली आहे. रुपाली चाकणकर यांना एसआयटी पथकाने नोटीसही बजावली आहे. मात्र त्यांची कुठलीही चौकशी झाली नाही.

आता, रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी नोटीस दिल्याची माहिती मिळाली आहे. समता पतसंस्थेतील खात्यांसदर्भात शिर्डी पोलिस त्यांची चौकशी करणार आहे. समता पतंसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांचे देखील ४  खाते आहेत. प्रतिभा चाकणकर यांच्या नावे २ तर त्यांच्या मुलांच्या नावे २ खाती आहेत. या ४ खात्यांवर २  कोटी ४० लाख रुपयांचा मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती मिळाली आहे. तपास अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. आता या पैशांसदर्भात आणि मोठ्या आर्थिक व्यवहारासंदर्भात प्रतिभा चाकणकर यांची कायदेशीर चौकशी होणार आहे.

समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असलेले १०० खाते आहेत. तर सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असेलेले ३२  खाते आहेत. सिन्नर येथील जगदंब ३२ खात्यांची चौकशी नाशिक ग्रामिण पोलीस करणार आहे. समता पतसंस्थेतील खात्यांची चौकशी शिर्डी पोलिसांकडून करत आहे. त्यामुळे प्रतिभा चाकणकर यांची चौकशीही शिर्डी पोलिसांकडून होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

न्यायालयात तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी अशोक खरात लोकांना नकली साप आणि वाघ दाखवून घाबरवत असे. तसेच मंतरलेले खडे, चिंचोके विकून फसवणूक करत होता. काही महिलांना द्रव्य किंवा पेढे खाऊ घालून लैंगिक अत्याचार केल्याचा नाशिक पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात अधिक तपास नाशिक व अहिल्यानगर पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा