मुंबई – महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणी भोंदू अशोक खरात विरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर एसआयटीमार्फत त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आता एक धक्कादायक नवा ट्विस्ट आला आहे. बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीकडे एक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ही तक्रार बीडमधील एका व्यक्तीने एसआयटीकडे लेखी स्वरूपात केली आहे. त्याने तक्रारीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका निर्माण होऊ शकतो, असा खळबळजनक दावा केला आहे. या तक्रारीमध्ये किती तथ्य आहे? हा आरोप केवळ राजकीय हेतूने प्रेरित आहे की त्यामागे काही ठोस पुरावे आहेत?
याची पडताळणी आता एसआयटीकडून केली जाणार आहे. या तक्रारीनंतर राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले असून राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने केली आहे. उदयकुमार आहेर यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आहेर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे कि अजितदादांच्या पुणे आणि मुंबई येथील बंगल्याबाहेर झालेली काळी जादू, विमान अपघातात मृत्यू, खरात याच्याकडे दादांच्या फोटोवर फुली मारलेली असल्याचा सापडलेला पुरावा, खरातचे व्हीएसआर या विमान कंपनी सोबत उघड झालेले संबंध, खरात याच्यासोबत रूपाली चाकणकर यांचे असलेले नाते, सुनेत्रावहिनींनी रूपाली चाकणकर यांच्या दोन्ही पदांचा घेतलेला राजीनामा या सर्व गोष्टी लक्षात घेता बीड जिल्ह्यातील व्यक्तीने केलेली तक्रार निश्चितच गांभीर्यपूर्वक घेण्यासारखी आहे, असे आहेर यांनी म्हटले आहे.
रुपाली चाकणकर यांचे नाव अशोक खरात प्रकरणात पुढे आले होते. तो त्यांचा गुरु होतचा, खरातसोबतचे चाकणकरांचे अनेक फोटोही समोर आले होते. एवढंच नव्हे तर दृ अशोक खरातच्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर या ट्रस्टी होत्या अशी माहिती देखील उघड झाली होती. अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात त्या अशोक खरातची पाद्यपूजा करत असल्याचे दिसत होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत होती.
त्यामुळे त्यांना आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांच्याकडून पक्षाचं महिला अध्यक्षपदाही काढून घेण्यात आलं. विशेष म्हणजे चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी सुनेत्र पवार आग्रही होत्या. पक्षातील काही बड्या नेत्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न चाकणकरांनी केला. मात्र सुनेत्रा या राजीनामा घेण्यावर ठाम होत्या आणि त्यामुळेच चाकणकरांना खुर्ची सोडावी लागली अशा बातम्या चाकणकरांच्या राजीनाम्याच्या दरम्यान पुढे आहे. आता पुन्हा एकदा चाकणकर यांच्यापासून सुनेत्र पवारांना धोका असल्याची तक्रार करण्यात आल्याने रूपाली चाकणकर चर्चेत आल्या आहेत.
अशोक खरात प्रकरणात फसवणूक झालेल्या महिला आणि इतर पीडितांसाठी एसआयटीने हेल्पलाईन क्रमांक आणि इतर माध्यमे उपलब्ध करून दिली आहेत. या माध्यमातून दररोज विविध प्रकारच्या तक्रारी येत आहे. यामध्ये केवळ आर्थिक फसवणूक किंवा लैंगिक शोषणाचेच गुन्हे नाहीत, तर अनेक कौटुंबिक वादासंदर्भात देखील तक्रारी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. खरात प्रकरणाचा मुख्य तपास करत असतानाच, दररोज येणाऱ्या या शेकडो तक्रारींची सत्यता पडताळून पाहणे हे एसआयटीसमोर मोठे आव्हान ठरत आहे. दरम्यान आतापर्यंत १५ गुन्हे दाखल झाल्यानंतर इतरांचे भविष्य सांगणारा भोंदू खरातचे स्वतःचे भवितव्य अंधारात दिसून येत आहे.





