शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू; आईची पोलिसात तक्रार, कारवाईची मागणी

SHARE:

मुंबई – शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका चार महिन्यांच्या निष्पाप बाळाचा मृत्यू झाला. माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना मुंबईतील प्रसिद्ध वाडिया हॉस्पिटलमध्ये घडली. या प्रकरणात पालकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी मृत मुलाच्या आईने भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मृत बाळाला कपड्यात गुंडाळून एक महिला वाडिया रुग्णालयाबाहेर पडत असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सदर घटना समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना पाटील यांचा मुलगा शिवांश या टीबी झाल्याचे निदान झाल्यावर त्यांनी कल्याणमध्ये त्याच्यावर उपचार केले. यानंतर तेथील डॉक्टरांनी वाडिया रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. यानंतर त्या वाडियामध्ये मुलाला घेऊन आल्या. रुग्णालयाने तपासणी केल्यानंतर औषधोपचार केले आणि बाळ ठीक आहे असे सांगूण घरी पाठवले. मात्र प्रकृती बिघडल्यावर २९ मार्च रोजी पुन्हा दाखल करून घेतले. पण वरिष्ठ डॉक्टरांनी उपचार न करता केवळ शिकाऊ डॉक्टरांनी व नर्सने त्याच्यावर उपचार केले.

उपचारादरम्यान, डॉक्टरांनी मेंदूमध्ये द्रव साचण्याच्या विकाराचे निदान करून शिवांशवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतरही बालकाच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. असा दावा पीडित कुटुंबीयांनी केला आहे. डॉक्टरांनी डोक्याच्या शस्त्रक्रियेसाठी तीन टाक्यांचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात १२ टाके लावले. छातीत व गळ्यात नळ्या टाकण्यात आल्या. त्या खराब होत्या. असाही दावा कुटुंबाने केला.

व्हेंटिलेटरवर ठेवल्यावर दोन वेळा व्हेंटिलेटर आणि मॉनिटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ऑक्सिजन बंद पडला. अनुभवी डॉक्टरांऐवजी शिकाऊ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केला. यामुळे १० एप्रिलला बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी व्हिडीओ काढल्यावर रुग्णालय प्रशासनाने धमकावले. १३ दिवस आयसीयूमध्ये असताना बाळाने एकदाही डोळे उघडले नाही, असा आरोप अर्चना यांनी केला आहे. याप्रकरणी पीडित मातेने भोईवाडा पोलिस ठाण्यात १५ एप्रिल रोजी लेखी तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली आहे. इतकेच नाही तर राष्ट्रपति, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिले असून यात न्यायाची मागणी करण्यात आली आहे.

मात्र रूग्णालयाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. वाडिया रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की या बाळाचे सर्व उपचार हे नियमानुसार आणि त्यांच्या प्रकृतीनुसार झालेत. आम्ही संपूर्णपणे मोफत उपचार केले असून बाळाची प्रकृती नाजूक असल्याचे पालकांना सांगण्यात आले होते. बाळ बिकट परिस्थितीत रुग्णालयात दाखल झाले होते, त्याची पूर्वकल्पना दिली होती.

Leave a Comment