राजस्थान – राज्यातील आयपीएस अधिकारी आणि पोलिस महानिरीक्षक किशन सहाय (मानवाधिकार विभाग) यांच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून किशन सहाय यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारने त्यांना पदावरून तात्काळ कार्यमुक्त केले असून त्याला एपीओ म्हणजे पदस्थापना आदेशाच्या प्रतीक्षेत ठेवले आहे. या प्रकरणाने राजस्थान पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
पीडित महिलेने पोलिसांकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीच्या आधारे जयपूरमधील मालवीय नगर पोलिस ठाण्यात आयजी किशन सहाय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की आयपीएस अधिकारी किशन सहाय यांनी तिला लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलावले. येथे तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करण्यात आला. विरोध केला असता तिला मारहाण करण्यात आली. अधिकाऱ्याने तिचा मोबाईल फोन जप्त करून बंद केला आणि तक्रार दाखल न करण्याची धमकी दिली.
महिलेचा दावा आहे की गेल्या तीन महिन्यांपासून तिला व्हिडिओ कॉलद्वारे धमक्या दिल्या जात आहेत. भीतीपोटी, तिने दुसऱ्या राज्यातून टपालाने आपली तक्रार पाठवली. महिलेच्या या तक्रारीची दखल घेत आयजी किशन सहाय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यावर बलात्काराच्या आरोपात गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून राजस्थान पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. आम्ही प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहोत. तथ्यांची पडताळणी केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
या आरोपांवर स्पष्टीकरण देताना, आयपीएस अधिकारी किशन सहाय म्हणाले कि त्यांची विचारसरणी वैज्ञानिक आहे आणि ते त्याच तत्त्वांवर बोलतात, म्हणूनच त्यांच्याविरुद्ध कट रचला जात आहे. मीना म्हणाले की ते गेल्या दहा वर्षांपासून विज्ञानाचा प्रचार करत आहेत. अशा परिस्थितीत, अंधश्रद्धेत अडकलेल्या लोकांना विज्ञान पचवता येत नाही. त्यांना बदनाम करण्याच्या कटाचा भाग म्हणून हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मीना असेही म्हणाले की त्या महिलेने त्यांना अनेक वेळा मेसेज केले होते. चॅटवरून हे स्पष्ट होते की, त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी तिने हा गुन्हा दाखल केला आहे.
आयजी किशन सहाय आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून वैज्ञानिक विचारांचा प्रचार करत आहेत. ते लोकांना खोट्या बाबांच्या फसवणुकीपासून दूर राहण्याचा सल्लाही देतात. त्यांच्या मते, धर्म आणि देवावर विसंबून प्रगती शक्य नाही. विज्ञान हाच प्रगतीचा खरा मार्ग आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की भारताने महासत्ता बनावे अशी जवळपास सर्वच भारतीयांची तीव्र इच्छा आहे, परंतु हे केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक विचारांनीच शक्य आहे. धार्मिक अंधश्रद्धा हा मार्गभ्रष्टतेचा मार्ग आहे, जो समाजाने आणि देशाने सोडून दिला पाहिजे.






