शेतजमिनीच्या वादातून भीषण हत्याकांड; ६ जणांची गोळ्या झाडून हत्या, भीमा नदी परिसरात दहशतीचे वातावरण

SHARE:

विजापूर – शेतजमिनीच्या वादातून धारदार शस्त्रांनी हल्ला करून 6 जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. भीमा नदी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात भयानक हत्याकांड घडले आहे. जमिनीच्या वादातून हे भयानक हत्याकांडाची घटना घडली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील भीमा नदी परिसरातील जुन्या वैमनस्याच्या घटना पुन्हा चर्चेत आल्या आहेत. जमीन मालमत्तेच्या वादातून कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यात असलेल्या गोविंदपूर गावात शुक्रवारी हे हत्याकांड घडले आहे. धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यानंतर 6 जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निराळे आणि गोळगी कुटुंबांमध्ये सुरू असलेल्या जमीन वादातून हा वाद झाला आहे. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि गोळीबार करत 6 जणांचा जीव घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे आणि शब्बीर नदाफ यांचा मृत्यू झाला आहे. तसेच आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 6 वर पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून दोन्ही कुटुंबांमध्ये अनेक वर्षांपासून जुना वाद सुरू होता.

हा वाद मिटवण्यासाठी काही दिवसांपूर्वी स्थानिक स्तरावर मध्यस्थीची बैठक घेण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. शुक्रवारी जमीन वादावर तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आणखी एका बैठकीसाठी निराळे कुटुंबातील लोक आणि इतर काही जण गेले असता त्यांच्यावर हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या हत्याकांडातील सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणी चडचण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील भीमा नदीच्या तीरावरील गावांमध्ये जमीन वाद, अनैतिक संबंध तसेच स्थानिक जुन्या वादांच्या कारणांवरून यापूर्वीही अनेक खून आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही वर्षांत सीमाभागात अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. या सामूहिक हत्याकांडामुळे भीमा नदी परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. गोविंदपूर येथील निराळे कुटुंब हे चडचण परिसरातील प्रतिष्ठित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांपैकी एक मानले जाते.

या मोठ्या संयुक्त कुटुंबात 30 हून अधिक सदस्य आहेत. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले चंद्रशेखर निराळे हे माजी तालुका पंचायत सदस्य होते. प्राथमिक माहितीनुसार, 25 एकर जमिनीच्या व्यवहारातून हा वाद झाला होता. निराळे कुटुंबाने ही जमीन प्रतिएकर 15 लाख रुपयांप्रमाणे खरेदी केली होती. मात्र, बाजारभाव जास्त असताना कमी दरात जमीन विकली गेल्याने गोळगी कुटुंब नाराज होते. संबंधित जमीन स्वतः खरेदी करण्याची इच्छा असलेल्या अप्पुगौडा गोळगी यांनी निराळे कुटुंबाला हा व्यवहार करू नये, अशी धमकी दिल्याची माहिती उघड झाली आहे.

तरी जमीन व्यवहार पूर्ण झाल्यानंतर संतप्त झालेल्या गोळगी कुटुंबीयांनी बदला घेण्याच्या भावनेतून मोठा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऊस तोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या धारदार शस्त्रांचा या हल्ल्यात वापर केला आहे. निराळे आणि गोळगी कुटुंबांमध्ये 15 वर्षांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. ही जमीन निराळे कुटुंबाने खरेदी केल्यानंतर हा संघर्ष वाढला. या घटनेत अधिक तपास विजापूर पोलिस करत आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा