मुंबई – सीमाशुल्क विभागाकडून सोने तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या प्रकरणात 2 प्रवाशांकडून 2.6 किलो सोने जप्त केले आहे. मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा भांडाफोड करण्यात आला आहे. दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून 4.9 कोटींचे सोने जप्त करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय तस्करी प्रकरण उघडकीस आले आहे.
या प्रकरणामागील मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी मोहीम सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर पथकाला दुबईहून मोठ्या प्रमाणात सोने तस्करी करून भारतात आणले जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या आगमन विभागात सापळा रचून संशयित प्रवाशांवर नजर ठेवली आहे. दुबईहून मुंबईत दाखल झाल्यानंतर संकेत गडावे, कोल्हापूर आणि प्रतीक जाधव, सांगली हे दोघे ग्रीन चॅनेलमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असताना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली आहे.
सुरुवातीला दोघांनीही आपल्याकडे कोणतीही संशयास्पद वस्तू नसल्याचा दावा केला. मात्र अधिकार्यांच्या चौकशीनंतर आणि वैयक्तिक झडतीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सीमाशुल्क कायदा 1962 अंतर्गत घेण्यात आलेल्या झडतीमध्ये दोन्ही प्रवाशांच्या कपड्यांमध्ये काळ्या रंगाच्या पिशव्या लपवून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या पिशव्यांमध्ये मेणाच्या स्वरूपात सोन्याची धूळ लपविण्यात आली होती. तपासानंतर या सोन्याचे वजन सुमारे 2.6 किलो असल्याचे समोर आले आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी दुबईतील एका व्यक्तीकडून हे सोने स्वीकारल्याची कबुली दिली आहे. सीमाशुल्क विभागाची दिशाभूल करून हे सोने भारतात आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे सोने कायदेशीर मार्गाने आयात करण्यात आले असते तर, सरकारला 1.46 कोटी रुपयांचा महसूल मिळाला असता. या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सीमा शूल्क विभागाची पुढील चौकशी सुरू आहे.
तस्करीसाठी वापरण्यात आलेले नेटवर्क, भारतातील सोने स्वीकारणारे एजंट, तसेच हवाला व्यवहारांशी संबंधित कोणते धागेदोरे आहेत का, याचा तपास केला जात आहे. मुंबई विमानतळावर अलीकडच्या काळात सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये दिवसेिंदवस वाढ होत आहे. त्यामुळे सीमाशुल्क विभागाने सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली आहे. आंतरराष्ट्रीय विमानांमधून येणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवण्यात येत आहे. या कडक कारवाईमुळे सोने तस्करांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या प्रकरणात अधिक तपास सीमाशुल्क विभाग करत आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.





