भंडारा – ज्यांनी अडीच हजार वर्षांत एकही वॉल्टेअर जन्माला घातला नाही, ते आज बहुजन समाजाकडे मेरिट नसल्याचे तुणतुणे वाजवत आहेत. या आरोपाला अनेकांनी आजपर्यंत तोंडघशी पाडलं आहे. आता भंडारा येथील नमीरा सिद्दिकी यांनी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी नीट एमडीएस परीक्षेत देशभरातून प्रथम क्रमांक पटकावत मेरिटचा आव आणणार्यांना चांगलीच चपराक लावली आहे.
नमिरा सिद्दिकी ही मूळची भंडारा येथील रहिवासी असून सध्या नागपूरच्या वानाडोंगरी येथील दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात शिक्षण घेत आहे. नमिरा सिद्दिकीने देशातील सर्वात स्पर्धात्मक पदव्युत्तर दंत प्रवेश परीक्षांपैकी एक एमडीएसच्या (मास्टर ऑफ डेंटल सर्जरी) राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेत (नीट) अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून बहुजन समाजातील मुलांकडे मेरिट असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. नमीरा सिद्दिकीने ‘नीट एमडीएस’ प्रवेश परीक्षेत देशभरातील 31 हजार विद्यार्थ्यांमधून सर्वाधिक 802 गुण प्राप्त करीत प्रथम ऑल इंडिया रँक प्राप्त केली आहे. तिच्या या अशाचे अनेक शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी आणि वैद्यकीय व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात कौतूक केले जात असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या नमिरा सिद्दिकीने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देशभरातून अव्वल स्थान पटकावले आहे. तिला ओरल सर्जन व्हायचे आहे. तिचा लहान भाऊ देखील सध्या नीट परीक्षेची तयारी करत आहे. आपल्या यशाबाबत नमिराने सांगितले कि माझा मुख्य भर रात्रीच्या अभ्यासावर होता. दिवसभराच्या गलबलाटापेक्षा रात्री शांततेत अभ्यास करणे अधिक सोयीचे वाटायचे. 24 तासांपैकी केवळ पाच तास झोपायची. उर्वरित वेळ अभ्यासाला द्यायची.
परीक्षेच्या तयारीबाबत समीराने सांगितले कि केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष परीक्षेचा सराव करण्यावर जास्त भर दिला. मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका वेळेच्या मर्यादेत सोडवण्याचा कमालीचा सराव केला. गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा हा सरावच तिला परीक्षेत वेळेचे नियोजन आणि अचूकता साधण्यासाठी फायदेशीर ठरला. नमीराचे हे यश बहुजन समाजातील विद्यार्थ्यासाठी एक प्रेरणा आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.






