अमली पदार्थांविरुद्ध पोलिसांची ऐतिहासिक कारवाई; ३ हजार कोटींचा साठा जप्त

SHARE:

पुणे – अमली पदार्थ विरोधात पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे, तर धाडीत 3 हजार कोटीहून अधिक रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी पुणे, दिल्ली, कुरकुंभ आणि सांगली परिसरात धाड टाकून 3 हजार 700 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. आता या प्रकरणाचे धागेदोरे अधिक स्पष्ट झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, गुन्हे शाखेच्या पथकाने विश्रांतवाडी परिसरात धाड टाकून एका टेम्पोमध्ये लपवून ठेवलेला 340 किलो अमली पदार्थांचा कच्चा माल जप्त केला आहे.

या कच्च्या मालामध्ये घातक रासायनिक पदार्थांचा समावेश आहे. त्याचा वापर मेफेड्रोन सारखे अमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जात होता, अशी माहिती मिळाली पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत मेफेड्रोन तयार करण्यासाठी लागणारे रसायन विश्रांतवाडीतील एका टेम्पोमध्ये दडवून ठेवल्याचे समोर आले. पोलिसांनी कारवाई करत हा 340 किलो साठा जप्त केला आहे. हा सर्व कच्चा माल पुढील तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.

प्रयोगशाळेच्या अहवालानंतर यातील नेमक्या रसायनांची माहिती स्पष्ट होईल, असे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. प्राथमिक माहितीनुसार खोकल्याच्या औषधासाठी जे रासायनिक पदार्थ वापरले जातात, त्याचाच वापर करून हे अमली पदार्थ बनवले जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे देश-परदेशात पसरली आहेत.

पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात हे मेफेड्रोन तयार केले जात होते. या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आले आहे. या संपूर्ण तस्करीचा मुख्य आरोपी संदीप धुनिया हा परदेशात फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडूल फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment