आपुलिया बळे l नाही मी बोलत ||

SHARE:

तुका म्हणे, शोभा सांगे

तुकारामाचा परमार्थ हा कवित्वाच्या मार्गाने वाटचाल करू लागला होता. लोकांना मात्र तुकारामांची वाणी ही देववाणी वाटू लागली. ह्या देववाणीला आवर घालणं कठीणच होते. तुकारामाच्याही  हातात काहीच राहिले नव्हते. देववाणीच्या गंगेचा प्रवाह वेगाने वाहू लागला होता. या प्रवाहाला सर्व बाजूंनी काव्याचे झरे फुटले होते.

तुकाराम अभंग रचू लागले. पण त्याचे श्रेय ते देवाला देऊ लागले. तुकारामांचा हा स्वभावच आहे. ते कमालीचे नम्र आहेत. तुकारामाच्या ठायी पराकोटीची लीनता आहे. काहीही असो तुकारामाच्या वाणीतून नकळत काव्यफुले उमलू लागली.
तुकारामाच्या अभंगातून वेद, उपनिषदे, गीता, ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथातील अनेक वचने सुबोध मराठी रूप घेऊन व्यक्त होऊ लागली.

कोणत्याही शाळेत कधीही न जाणाऱ्या तुकारामांचे कीर्तन ऐकण्यासाठी शेकडोंच्या संख्येने लोक जमू लागले. कीर्तनात सादर करणाऱ्या आणि स्वतः रचलेल्या अभंगांना स्वानुभवाची जोड ते देऊ लागले. अगदी तन्मय होऊन ते अभंग  म्हणत असत. ते ऐकण्यासाठी लोक कीर्तनाला येऊ लागले. कीर्तन ऐकणाऱ्या लोकांना कीर्तनातून आनंद, शांती मिळत होती. त्यांना परमार्थ, ईश्वर भक्ती समजू लागली, संसारात राहून परमेश्वर कसा आपलासा करावा याचे धडे मिळू लागले होते. तुकारामांचे अभंग कानावर पडल्याने लोक आनंदी झाले. दुःखी, कष्टी, अज्ञानी लोकांना कीर्तनात टाळ्या वाजवताना आणि माना डोलावताना अपार सुख लाभत होते.

पण दुसरीकडे याच्या विरुद्ध परिस्थिती होती. तुकाराम कुणबी म्हणजे क्षुद्र जातीचे होते आणि त्याकाळी इतर लोकांना क्षुद्र माणसाला परमार्थ सांगण्याचा मुळीच अधिकार नव्हता. क्षुद्र व्यक्तीने अध्यात्म पर कवित्व रचना करून लोकांना उपदेश करू नये. अशी तत्कालीन समाजाची धारणा होती. जातीने क्षुद्र असून तुकाराम कवित्व करतो, लोकांना उपदेश करतो, कीर्तने करतो हे देहुच्या काही लोकांना सहन झाले नाही. म्हणून ते तुकारामाचा द्वेष करू लागले. त्यामध्ये मांमजी भट, रामेश्वर भट अग्रेसर होते. त्यांनी तुकारामाचा मानसिक, शारीरिक असा अनेक प्रकारे छळ केला. पण तुकारामांच्या अभंग रचना करण्यात आणि कीर्तने करण्यामध्ये काडीचाही फरक पडला नाही. उलट त्यांची काव्यसरिता अव्याहत वाहातच राहिली.

नंतर तर त्यांचे कवित्व अधिकच बहरू लागले. त्यांच्या शब्दाशब्दात एक प्रकारचा जिव्हाळा अन् कमालीची उत्कटता, आतुरता, भरभरून दिसू लागली. त्यांच्या शब्दाशब्दाला परतत्वाचा स्पर्श झाला होता. असे वाटत होते गुरूपदेश झाल्यानंतर त्यांचा अध्यात्मिक अधिकार वाढल्याने तुकारामांचे अभंग आत्मविश्वासाने बहरू लागले. प्रत्यक्ष भगवंतच त्याच्या मुखातून बोलतो. अशी त्यांची धारणा झाली होती. कवित्वाबरोबरच अविरत त्यांचे मनन चिंतनही चालूच होते. जसजशी त्यांच्या विचारणा उंची प्राप्त होऊ लागली तसतसे त्यांचे नीज जीवन उंचावू लागले. त्यांना अभ्यासाचा छंद लागला. वेद उपनिषदे भागवत गीता, संतांचे अभंग, संतवचने आदींचा ते नियमित अभ्यास करू लागले.

असाध्य ते साध्य l करिता सायास ||
असे तुकाराम सांगतात आणि स्वतः आचरणात आणतात रात्रंदिन प्रयत्न करून शास्त्रातील अनेक गोष्टी त्यांनी समजून घेतल्या. त्यामुळेच दुसऱ्यांना ते उत्तम प्रकारे समजावून सांगू शकले.

तुकारामांच्या अनेक अभंगातून तत्कालीन समाजाचे यथार्थ चित्रण पहावयास मिळते. त्यावरून समज व सामाजिक परिस्थिती यांची माहिती मिळते. सामाजिक भेदाभेद, उच्च-नीच भेद, दांभिक-ढोंगी साधू, धर्मज्ञानी, कर्म कांड करणारे, गांजा-अफू  सेवन करणारे, जादूटोणा-चमत्कार करणारे, भक्ती शून्य पंडित, क्षुद्र दैवतोपासना करणारे अशा किती तरी लोकांचा तुकारामांनी आपल्या अभंगातून आणि कीर्तनातून चांगलाच समाचार घेतलेला आहे आणि त्याचे सर्व श्रेय पांडुरंगाला देऊन म्हणतात.

आपुलिया बळे l नाही मी बोलत ||

लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक,
साहित्यिक तथा कवी

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment