तुका म्हणे, शोभा सांगे…
तुकारामाच्या अनेक अभंगातून तत्कालीन सामाजिक स्थितीचे दर्शन घडते. त्यामुळे तत्कालीन समाज कसा होता, समाजातील लोकांचे बोलणे, वागणे, व्यवहार, चालीरीती, दैवते, अंधश्रद्धा, ज्ञानिपंडीत, अज्ञानी, दीन दुबळे लोक अशा सर्व स्थितीचा अंदाज येतो. सामाजिक आणि राजकीय परिस्थिती कळून येते. सामाजिक परिस्थितीचा राजकीय परिस्थितीवर प्रभाव आहे की, राजकीय परिस्थितीचा समाजावर प्रभाव आहे, हे ही कळून येते.
राजकीय परिस्थिती –
तत्कालीन राजकीय परिस्थिती सर्वानाच माहीत आहे. इ. स. तेराव्या शतका पासून महाराष्ट्रावर मोघलांचे आक्रमण झाले. देवगिरी प्रांतात यादवांचे साम्राज्य होते ते नष्ट झाले आणि महाराष्ट्र भर मुसलमानी सत्तेचा अंमल सुरू झाला. तेव्हापासून पुढे जवळ जवळ तीनशे वर्षे महाराष्ट्रावर मुसलमानी अंमल सुरू होता. हे राज्यकर्ते धर्मवेडे, क्रूर व जुलमी होते. त्यांनी हिंदू प्रजेची लूट केली. स्त्रियांवर अत्याचार केले. देवळे व देवमूर्ती यांचा विध्वंस केला. जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडले.
सामाजिक परिस्थिती –
तत्कालीन बहुतांशी समाज हा अज्ञानात होता. तत्कालीन समाजात दांभिक व ढोंगी साधूंचा सर्वत्र सुळसुळाट झाला होता. ढोंगी स्वतःला धर्म ज्ञानी समजत. गरीब, अज्ञानी जनतेला फसवित. परधन आणि परनारी ह्याची अभिलाषा बाळगत असत.
कथा करतो देवाची l
अंतरी आशा बहु लोभाची ll
तत्कालीन समाजात भगवे वस्त्र धारण करणारे जटा वाढविणारे, दाढी वाढविणारे, भोंदू बाबा असत. काही अंगात भुते आणित..कोणी भविष्य सांगत. अशा सर्व प्रकारच्या ढोंगी लोकांचा तुकारामांनी खरपूस समाचार घेतला आणि लोकांना सावध केले.
बाह्य कर्मकांडे –
त्या काळी समाजात बाह्य कर्मकांडाचे फाजील स्तोम माजले होते. समाजात नवसायास, अंगारे, धुपारे, जादूटोणा, चमत्कार यांचेही प्रस्थ माजले होते. हे लोक गांजा, अफू, मद्यसेवन करीत असत, व्यभिचार करत आणि लोकांना लुबाडीत असत.
क्षुद्र दैवतोपासना –
त्याच वेळी अज्ञानी आणि गरीब लोक भोंदू साधूंचे ऐकून सेंदरी-हेंदरी दैवतांची पूजा करीत असत आणि कोंबड-बकरा यांचा बळीही देत असत.
भक्ती शून्य पंडित –
शुद्ध भक्ती कशी असते हे सांगणारे भक्ती शून्य पोटार्थी पंडितांचा सुळसुळाट देखील खूपच झाला होता. अध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करणे, पुराणातील कथा सांगणे, प्रवचने करणे, कीर्तन करणे हीच त्यांची मुख्य कामे होती..
ह्या कामामध्ये अज्ञानी जनतेचा फायदा घेऊन त्यांना फसविले आणि नगविल्याच जात असे. भक्ती शून्य पंडित अहंकारी असत. अहंकारामुळे त्यांच्या मनात इतर लोकांबद्दल दया, माया नव्हतीच. तुकारामांनी अशांवर चांगलीच टीका केली आहे.
शब्द ज्ञानी एक अपुल्या मते l
सांगती वेदांत भिन्न भिन्न भावे ll
तुका म्हणे एक भाव न धरिती l
पडीली हे माती त्यांचे तोंडी ll
केवळ शाब्दिक ज्ञान असणारे हे पंडित आपापल्या मताप्रमाणे वेदांतातील भिन्न भिन्न पक्षाचे समर्थन करत असत.समाजातील सर्व भोंदुंचा अभ्यास करून तुकारामांनी वेळोवेळी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
लेखक –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक,
साहित्यिक व कवी
संपर्क – ९४२३२७९४३२
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.






