धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्य विशेष…

SHARE:

दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी असलेल्या अशोका विजया दशमी निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समाजसेवा गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक व कवी प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांची ‘दीक्षाभूमी एक क्रांतिभूमी‘ ही मुक्तछंदातील कविता येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

दीक्षाभूमी एक क्रांतिभूमी

नागपूरच्या दीक्षाभूमीवर
घडते तथागत गौतम बुद्ध
आणि संविधानाचे शिल्पकार
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांचे दर्शन

नागपूरच्या या दीक्षाभूमीवर
बाबासाहेबांनी लाखो अनुयायांना
बुद्ध धम्माची दीक्षा देऊन
इतिहास एका रात्रीत बदलला
शोषितांच्या जीवनातील तिमिराला
एक नवा प्रकाशमार्ग लाभला

ती फक्त एक जागा नाही,
ती तर एक महान क्रांतिभूमी आहे
शतकानुशतके सहन केलेल्या
वेदनेचा हुंकार आहे

बाबासाहेबांच्या धर्मांतराने
गुलामीच्या बेड्या क्षणात तुटल्या,
मानवतेचा महामंत्र सांगत,
धम्माच्या पाऊलखुणा येथेच उमटल्या.

जयभीमची गर्जना देत
दीक्षाभूमीवर येतात लाखो बांधव
नवे परिवर्तनवादी बाबासाहेबांचे
विचार मनात रुजवायला

दीक्षाभूमीची ही पवित्र माती
शिकविते हक्कासाठी लढायला
बुद्ध – फुले – शाहू – आंबेडकरी
विचारधारेची प्रेरणा देते लिहायला

फुले – शाहू विचारांच्या
पुस्तकांची यात्रा म्हणजे दीक्षाभूमी
बुद्ध – बाबासाहेबांच्या विचारांच्या
पुस्तकांची यात्रा म्हणजे दीक्षाभूमी

येथे आलेला प्रत्येक बांधव
फक्त ग्रंथच खरेदी करीत नाही
तर बुद्ध – फुले – शाहू – आंबेडकरांचा
क्रांतिकारी विचारही घेऊन जातो सोबत
स्वतःच्या शहर नि ग्रामामध्ये
परिवर्तनवादी विचार पेरायला

दीक्षाभूमी हीच खरी प्रेरणा
माणसाला माणूस म्हणून जगण्याची
स्वातंत्र्य, समता, बंधुता नि न्यायाची

तथागत गौतम बुद्धाला
करितो मी वंदन ॥
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना
करितो अभिवादन ॥

 

लेखक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्यरत्न
पुरस्कार प्राप्त साहित्यिक व कवी,
काँग्रेस नगर, अमरावती.
संपर्क : ८०८७७४८६०९

 

प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले

लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समीक्षक, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा