दसरा – समानतेचा उत्सव
सोनं वाटूया दसऱ्याला, द्वेष मनातून काढूनी
माणुसकीची ज्योत लावू, हात हातात घेऊनी ll१ll
उंच-नीच हा भेद कसला, आपण सारे एकच
रक्ताचा रंग एकच आहे, मग भेदभाव तो फेकच ll२ll
स्त्री असो वा पुरुष असो, सन्मान सारखाच द्यावा,
समाजात सर्वांना समानतेचा संदेश द्यावा ll३ll
प्रेमाने हे जग जिंकता येते, द्वेषाने कधीच नाही
दसऱ्याचा संदेश हाच आहे, विसरू नका कधीही ll४ll
अज्ञानाचा वध करू,ज्ञानाची शस्त्रे हाती घेऊ,
शिक्षणाची गंगा घरोघरी, प्रेमाने आपण नेऊ ll५ll
जिथे प्रेम तिथे देव राहतो, हेच सत्य सनातन
माणसाला माणूस समजणे, हेच खरे पूजन ll६ll
मी पणाची रावणरूपी वृत्ती, आज जाळून टाकू
आपलेपणाचे सोने वाटत, नाते घट्ट करून टाकू ll७ll
सांगणे हेच सदा, समतेचा मंत्र जपा
बुद्ध, फुले, आंबेडकरांचा, विचार हृदयी ठेवा ll८ll
कोण मोठा कोण छोटा, हा विचार सोडून द्या
प्रत्येकात ईश्वर पाहून, प्रेमाची साथ द्या ll९ll
दसरा येता आनंद घेऊ, दुःख सारं विसरू
विजयादशमीच्या शुभ दिनी, प्रेमाचं गीत गाऊ ll१०ll
लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याच्या अभ्यासक, अमरावती.
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.






