गुजरात – गेल्या जानेवारी महिन्यात उच्च शिक्षण संस्थांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या छळावर प्रतिबंध घालणाऱ्या यूजीसीच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यानंतर आता पुन्हा एकदा गुजरातच्या राजकोटमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील फालसुंद गावातील एमबीबीएसच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी रतन कुमार मेघवाल याने आत्महत्या केली. १४ मार्च रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास रतनने जामनगर रोडवरील घंटेश्वर भागाजवळ ट्रेनसमोर उडी मारली.
पोलिसांनी घटनास्थळावरून रतनची बॅग जप्त केली, ज्यात १७ पानांची सविस्तर सुसाईड नोट होती. या नोटमधे रतनने पाच सहविद्यार्थ्यांवर शारीरिक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. चिठ्ठीनुसार, त्याचे सहविद्यार्थी जानेवारी २०२६ पासून त्याचे एका मैत्रिणीसोबत संबंध असल्याचा संशयावरून त्याला लक्ष्य करत होते. रतनने लिहिले आहे की या विद्यार्थ्यांनी केवळ त्याला मारहाणच केली नाही, तर त्याच्यावर सतत मानसिक दबावही टाकला. यामुळे तो अत्यंत व्यथित झाला. ही चिठ्ठीच त्याचा अंतिम बयान म्हणून विचारात घ्यावी, अशी त्याने न्यायालयाला विनंती केली.
ही चिठ्ठी सापडल्यानंतर, रतनचे वडील मोहनलाल मेघवाल यांनी राजकोटमधील गांधीग्राम पोलीस ठाण्यात त्या पाच विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. वडिलांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आणि न्यायालयाची कोठडी मिळवली. रतनने आपल्या मृत्यूसाठी प्रणव पालीवाल, अस्मित शर्मा, आणि आणखी तिघांना जबाबदार धरले आहे.
माहित असावे कि यूजीसीच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नवे नियम हे अस्पष्ट असून, या नियमांचा दुरुपयोग होऊ शकतो, असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटिस, बजावली असून, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही १९ मार्च रोजी होणार आहे. यूजीसीने लागू केलेल्या नव्या नियमांना ब्राह्मण समाज विरोध करत आहेत. तर एससी, एसटी आणि ओबीसींचे विद्यार्थी संघटनांसह अनेक सामाजिक संघटना देखल यूजीसी बील लागू करण्याची मागणी करत आहेत. यासाठी त्यांनी देशभरात मोर्च, धरणे आंदोलन आणि रॅल्या काढल्या जात आहेत.





