जात प्रमाणपत्र मंजूरीसाठी अडीच लाख रुपयांची लाच घेताना कोकण विभागाच्या उपसंचालकांना अटक

SHARE:

मुंबई – जात प्रमाणपत्र मंजूरीसाठी अडीच लाख रुपयांची लाच घेताना कोकण विभागाच्या उपसंचालकांना अटक करण्यात आली आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीची फाईल मंजूर करून देण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून ठाण्यात एसीबीकडून क्लास वन महिला अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणीची फाईल मंजूर करून देण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभागाच्या उपसंचालक मीनाक्षी उन्हाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे.

लाच प्रकरणात न्यायालयाने कोकण विभागाच्या उपसंचालक मीनाक्षी उन्हाळे यांना २ दिवसांसाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एका तक्रारदाराने आपल्या मुलीला डी.एड. अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी तसेच पत्नीच्या नोकरीसाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने २०२० मध्ये अर्ज केला होता. हा अर्ज ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष ठाणे शहरातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभागाच्या कार्यालयात सादर करण्यात आला होता.

महाड तालुक्यातील एका तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, अर्जाची फाईल मंजूर करून देण्यासाठी कोकण विभागाच्या उपसंचालक मीनाक्षी उन्हाळे यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणाची माहिती महाड तालुक्यातील तक्रारदाराने १२ फेब्रुवारी रोजी एसीबीच्या रायगड विभागाकडे दिली होती. या तक्रारीची पडताळणी एसीबीकडून दुसऱ्याच दिवशी करण्यात आली होती.

या पडताळणीत लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीकडून सापळा रचला होता. पोलिस उपअधीक्षक सरिता भोसले आणि पोलिस निरीक्षक निशांत धनवडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ठाणे येथील कार्यालयात कडक कारवाई केली आहे. महाड येथील तक्रारदाराकडून अडीच लाख रुपयांची लाच घेताना कोकण विभागाच्या उपसंचालक मीनाक्षी उन्हाळे यांना त्यांच्या ठाणे येथील कार्यालयात अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा