नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता १० वी आणि १२ वी च्या बोर्ड परीक्षांच्या मूल्यांकन प्रक्रियेत गोपनीयता राखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना मूल्यांकनाशी संबंधित कोणतीही माहिती ऑनलाइन शेअर न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अन्यथा दोषींवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत बोर्डाकडून निर्देश जारी करण्यात आले आहेत.
सीबीएसईने म्हटले आहे कि मूल्यांकन प्रक्रिया गोपनीय असून ती कठोर नियमांनुसार चालते.
मूल्यांकनाशी संबंधित माहिती, कोणतीही दिशाभूल करणारी माहिती, अनुभव किंवा गुपिते सार्वजनिक माध्यमांवर शेअर करण्यास सक्त मनाई आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणे किंवा माहिती चुकीच्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करणे हे व्यावसायिक वर्तनाचे उल्लंघन आहे. त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. सर्व शिक्षकांना संयम बाळगण्याचा आणि परीक्षा प्रणालीची अखंडता जपण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सीबीएसईच्या असे लक्षात आले आहे की इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांच्या मूल्यांकन प्रक्रियेत सहभागी असलेले काही व्यक्ती सोशल समाज माध्यमांत टिप्पण्या, मते आणि अनुभव पोस्ट करत आहेत. यापैकी काही पोस्ट दिशाभूल करणाऱ्या किंवा चुकीच्या आहेत. यामुळे विद्यार्थी, पालक आणि इतर संबंधित घटकांमध्ये संभ्रम आणि अफवा पसरण्याचा धोका निर्माण होत आहे.
सीबीएसईने स्पष्ट केले आहे की बोर्ड परीक्षेच्या मूल्यांकन प्रक्रियेशी संबंधित खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यास मनाई आहे. संभ्रम किंवा चुकीची माहिती पसरवण्यासाठी कोणालाही सीबीएसईचे नाव, लोगो किंवा प्रतिमा वापरण्याची परवानगी नाही.
अशा कार्यात सहभागी असलेल्या कोणावरही कायदेशीर कारवाई केली जाईल. बोर्डाने संबंधित घटकांना अनधिकृत स्रोतांवरून मिळालेल्या माहितीवर अवलंबून न राहण्याचा सल्ला दिला आहे. अद्ययावत माहिती आणि इतर माहितीसाठी त्यांनी केवळ सीबीएसईच्या अधिकृत चॅनेल आणि वेबसाइटलाच भेट द्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.





