मुंबई – राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सहावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीचे पेपर तपासल्याचा प्रकार उघड करण्यात आला आहे. शाळेतील २६८ शिक्षकांनी दिव्यांग, घटस्फोटीत असल्याचे सांगुन बदली करुन घेतली आहे. राज्यात शिक्षण व्यवस्थेला बदनाम करण्याचे काम झाले आहे. राज्यातील साताऱा आणि अकोल्यामध्ये घडलेल्या २ घटनांमुळे राज्यातील शिक्षण व्यवस्था कशा पद्धतीने ढासळली आहे याचा प्रत्यय आला आहे.
राज्यातील शिक्षण क्षेत्रात दोन धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यात सातारा जिल्ह्यात दहावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर सहावीच्या विद्यार्थ्यांकडून तपासून घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे, तर अकोला जिल्हयात शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. साताऱा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे.
या प्रकरणात सहावीच्या विद्यार्थ्याकडून दहावीचे पेपर तपासून घेतले जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. ज्यामुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता आणि विश्वासार्हता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. याप्रकरणात संबंधित शिक्षकांचे नाव वैभव शेंडे आहे. त्याचवेळी असा कोणताही प्रकार झाला नसल्याचा दावा शाळेने केला आहे. हा प्रकार उघड करणाऱ्या तक्रारदारालाच संस्थेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
त्यामुळे हा वाद अधिकच वाढला आहे. पेपर तपासणारा शिक्षक आणि तक्रार करणारा व्यक्ती या दोघांनाही समान नोटीस देण्यात आली, अशी माहिती मिळाली आहे. दुसरीकडे अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागात आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर आला आहे. बदलीत फायदा मिळवण्यासाठी २६८ शिक्षकांनी दिव्यांग, परित्यक्त आणि अंतराच्या नावाखाली बोगस प्रमाणपत्रे सादर केली आहेत. काही शिक्षकांनी स्वतःला दिव्यांग दाखवले आहे.
तर काहीं शिक्षकांनी खोटा घटस्फोट दाखवून लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. या प्रकरणात प्रभारी गट शिक्षणाधिकारी दिनेश दुतोंडे यांच्यासह ४ जणांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच ३०० जणांवर कारवाईची शक्यता आहे. तक्रारीनंतर झालेल्या त्रिस्तरीय चौकशीत अनेक अहवाल दोषपूर्ण आढळले आहेत. तर राज्यातील अपात्र शिक्षकांना बदलीचा लाभ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्यातील शिक्षण विभागाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राज्यात एकीकडे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारे प्रकार होत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील शाळेतील शिक्षकांकडूनच नियमांचा गैरवापर होत आहे. राज्यात सातारा जिल्हा ते अकोला जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेतील घोटाळ्यामुळे मुलांचे नुकसान होत आहे, व यामुळे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.





