मुंबई – स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी गुरुवारी एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आधारित एका गाण्यासंदर्भात, महाराष्ट्र विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीसमोर झालेल्या सुनावणीदरम्यान उपमुख्यमंत्र्यांना गद्दार म्हटल्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला. या प्रकरणात कामरा तिसऱ्यांदा विधान भवनात हजर झाले होते.
हे प्रकरण मार्च २०२५ मध्ये मुंबईत झालेल्या त्यांच्या ‘नया भारत’ या स्टँड-अप शोसी संबंधित आहे. ज्यामध्ये कामरा यांनी ठाणे की रिक्शा, चेहरे पर दाढ़ी, आंखों पर चश्मा..हाय..एक झलक दिखलाए, कभी वह गुवाहाटी में छुप जाए; मेरी नजर से तुम देखो…वह एक गद्दार नजर आए, असं गाण म्हटलं होतं. हा व्हिडिओ ऑनलाइन समोर आल्यानंतर भाजप एमएलसी प्रवीण दरेकर यांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली होती.
आपल्या निवेदनात कामरा यांनी म्हटले आहे की बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक राजकारणी नाही तर देशातील सर्वात प्रसिद्ध राजकीय व्यंगचित्रकारांपैकी एक होते. त्यांनी अनेक दशके सत्ताधाऱ्यांवर टीका केली आणि त्यांची खिल्ली उडवली, तरीही त्यांच्याविरुद्ध कधीही हक्कभंगाची कारवाई सुरू झाली नाही. कामरा यांनी समितीला आठवण करून दिली की राजकीय व्यंग हे लोकशाहीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ही परंपरा आजचे कलाकार पुढे नेत आहेत.
त्यांनी पुढे असेही म्हटले की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करतात, ती व्यंग आणि टीकेवर आधारित आहे. त्यामुळे, जर आज ही परंपरा थांबवली गेली तर ते त्या वारशाच्या विरोधात असेल, जो स्वतः राजकारणी पुढे नेण्याचा दावा करतात.
समितीचा आरोप आहे की या सादरीकरणाद्वारे कामरा यांनी जाणीवपूर्वक उपमुख्यमंत्री शिंदे यांची खिल्ली उडवली आणि महाराष्ट्र विधानसभेचा अपमान केला. मात्र, कामरा यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, त्यांचे काम २०२२ च्या राजकीय घटनांवर आधारित होते आणि त्याचा सभागृहाच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही.
कामरा यांनी असेही म्हटले की त्यांनी ‘गद्दार’ हा शब्द वैयक्तिक मत म्हणून वापरला होता. त्यांनी स्पष्ट केले की उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी हा शब्द सार्वजनिकरित्या वापरला आहे आणि त्यांच्यावर कारवाई केल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. सुनावणीदरम्यान, समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी कामरा यांचे वर्तन आदरपूर्वक असल्याचे मान्य केले, परंतु त्यांनी बिनशर्त माफी मागण्यास नकार दिला. कामरा म्हणाले की माफी मागणे हे दांभिकपणाचे ठरेल आणि एक वाईट उदाहरण निर्माण करेल.
नंतर कामरा यांनी सोशल मीडियावर आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आणि सांगितले की त्यांनी समितीला स्पष्टपणे सांगितले होते की माफी मागणे अशक्य आहे, कारण त्यामुळे कलात्मक स्वातंत्र्याशी तडजोड होईल. त्यांनी असेही म्हटले की लोकशाही संस्थांच्या अधिकारांचा वापर नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी केला जाऊ नये, विशेषतः जेव्हा ते केवळ व्यंग किंवा उपहासाद्वारे आपली मते व्यक्त करत असतील.
कामरा यांचा युक्तिवाद आहे की लोकशाहीमध्ये अस्वस्थ करणाऱ्या मतांना आणि टीकेला वाव असायला हवा. जर कलाकारांना आणि विनोदी कलाकारांना भीतीदायक वातावरणात काम करावे लागले तर त्यामुळे समाजातील मुक्त अभिव्यक्तीची परंपरा कमकुवत होईल.कामरा यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही संस्थेचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू नसून राजकीय घटनांवर व्यंग्य करणे हा होता. अशा प्रकरणांमध्ये कारवाई झाल्यास ती केवळ एका कलाकारापुरती मर्यादित बाब राहणार नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण समाजातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होईल.
विशेषाधिकार समितीने अद्याप आपला अंतिम निर्णय दिलेला नाही आणि कामरा यांच्याकडून लेखी उत्तर मिळाल्यानंतर या प्रकरणावर पुढील विचारविनिमय होण्याची शक्यता आहे.





