रायपूर – छत्तीसगडच्या शक्ती जिल्ह्यातील वेदांता वीज प्रकल्पात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या शुक्रवारी २१ वर पोहोचली. या घटनेत जखमी झालेल्या १४ कामगारांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती अधिकार्यांनी दिली. यावरून कांग्रेस पक्षाने कंपनीवर मानवहत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
शक्तीचे पोलीस अधीक्षक प्रफुल्ल ठाकूर यांनी पीटीआयला सांगितले की मध्य प्रदेशातील सिंगरौली येथील रहिवासी असलेले कामगार किस्मत अली यांचा गुरुवारी रात्री रायपूर येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला, त्यामुळे मृतांची संख्या २१ झाली आहे.
१४ एप्रिल रोजी सिंगितराई गावातील वेदांता लिमिटेडच्या वीज प्रकल्पात हा स्फोट झाला. बॉयलरमधून टर्बाइनकडे उच्च दाबाची वाफ वाहून नेणाऱ्या स्टीलच्या नळीत हा स्फोट झाला, ज्यात अनेक कामगार गंभीररित्या भाजले. दरम्यान चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर नऊ जणांचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.
१५ एप्रिल रोजी रुग्णालयात उपचार घेत असताना आणखी सात कामगारांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये पश्चिम बंगालमधील सहा, छत्तीसगडमधील पाच, झारखंड आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी तीन, तसेच बिहार आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी दोन कामगारांचा समावेश आहे. जखमींवर रायगडमधील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.
निष्काळजीपणामुळे मृत्यू आणि यंत्रसामग्री चालवण्यातील हलगर्जीपणाप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, वेदांता कंपनीचे संचालक अनिल अग्रवाल आणि कंपनी व्यवस्थापक देवेंद्र पटेल यांच्यासह १० जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान दोषी आढळलेल्या इतरांवरही कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान शुक्रवारी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस आमदार चरण दास महंत यांनी वेदांता ग्रुपच्या अधिकाऱ्यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, जो हत्येच्या श्रेणीत येत नाही. पत्रकार परिषदेदरम्यान चरण दास महंत म्हणाले कि एसडीएम स्तरावरील चौकशीऐवजी या प्रकरणात न्यायालयीन चौकशीची गरज आहे. जखमींवर मुंबई किंवा कोईम्बतूर येथील विशेष बर्न युनिटमध्ये उपचार केले पाहिजेत. छत्तीसगडमध्ये एक अत्याधुनिक बर्न रुग्णालय असले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
चरणादास महंत म्हणाले की छत्तीसगडमधील स्वस्त बांधकाम साहित्य वापरणाऱ्या उद्योगांमध्ये वारंवार अपघात घडत आहेत. त्यांनी आरोप केला की अनेक उद्योगांनी स्वस्त चिनी साहित्याचा वापर केला आहे आणि परदेशातून खरेदी केलेल्या भंगार यंत्रसामग्रीचा वापर करून कारखाने उभारले आहेत, ज्यामुळे अपघात होत आहेत.
तसेच राज्य काँग्रेस समितीचे प्रभारी दीपक बैज म्हणाले की काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने तपास पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. तेथील परिस्थिती भीषण होती आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण होते. छत्तीसगड विधानसभेत सादर केलेल्या आकडेवारीचा हवाला देत ते म्हणाले कि गेल्या तीन वर्षांत राज्यात औद्योगिक अपघातांमध्ये जवळपास ३०० (२९५) कामगारांचा मृत्यू झाला असून 248 जण जखमी झाले आहेत.




