पिनराई विजयन यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी; समर्थकांचा आक्रमक पवित्रा, ईडी पथकावर हल्ला

SHARE:

केरळम – ईडीकडून देशभरात विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या घरी छापे टाकले जात आहे. यावरून विरोधी पक्ष केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत आहेत. ईडी केंद्र सरकारच्या इशार्यावरून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर छापे मारत असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप आहे. या दरम्यान नुकेतच केरळात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ईडीचे पथक माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या घरी छापा टाकायला गेले असता विजयन यांच्या निवासस्थानाबाहेर ईडी अधिकारी आणि सीपीएम कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. यादरम्यान वाहनांची तोडफोड करण्यात आली.

ईडीच्या पथकाने बुधवारी केरळचे माजी मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांच्या तिरुवनंतपुरम येथील घरी छापा टाकला. कोचीन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड घोटाळा प्रकरणी हा छापा टाकण्यात आला. मात्र ईडीचे पथक वापस येताना हा गोंधळ उडाला. ईडीने टाकलेल्या छाप्यांच्या निषेधार्थ विजयन यांच्या समर्थकांनी ईडीच्या ताफ्याला घेरले आणि वाहनांवर विटा व दगडांनी हल्ला केला. यामुळे वाहनांच्या काचा फुटल्या. परिस्थिती पाहून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.

व्हिडिओमध्ये काही कार्यकर्ते माजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या गेटवर ईडी अधिकाऱ्यांचा ताफा अडवताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी वाहनांना लक्ष केले. ज्यात काहींनी विटा फेकल्या आणि गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. पिनारयी विजयन यांच्या निवासस्थानी ईडी अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यामुळे संतप्त झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाता-पायांनी गाडीच्या काचा फोडल्या, तर एका कार्यकर्त्याने मोठ्या विटेने गाडीच्या पुढच्या काचेवर हल्ला केला.

ईडीच्या छाप्यावर माजी मुख्यमंत्री पिनारयी विजयन म्हणाले कि ईडीला बऱ्याच काळापासून माझ्या घराची झडती घ्यायची होती. या छाप्यामुळे विशेषतः राहुल गांधींना खूप आनंद होईल. त्यांनी म्हटले होते की पिनारयी विजयन यांच्या घरावर छापा का टाकला जात नाही, त्यांना अटक का केली जात नाही. भाजप सरकारने देशातील विरोधी नेत्याना नेहमीच जाणीवपूर्वक लक्ष केले आहेत. याविरोधात देशभरात तीव्र आंदोलने झाली आहेत.

ते म्हणाले कि हा आमचा शेवट नाही. आम्ही याकडे केवळ एक सुरुवात म्हणून पाहतो. अशा कारवाईमुळे आम्ही नष्ट होऊ शकतो, असा विचार कोणीही करू नये. स्थानिक लोकांच्या आणि पक्षातील सहकाऱ्यांच्या भावना येथे व्यक्त झाल्या. जेव्हा जेव्हा शत्रूंनी मला टारगेट करण्याची तयारी केली, तेव्हा मला पक्षाकडून भक्कम पाठिंबा मिळाला. माझ्या सहकाऱ्यांनी आज हे सिद्ध केले आहे की तो पाठिंबा कमी झालेला नाही. हीच आमची ताकद आहे.

दरम्यान, पिनारयी विजयन यांच्या तिरुवनंतपुरम येथील निवासस्थानावर ईडीने टाकलेल्या छाप्यामुळे संतप्त झालेल्या सीपीएमच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले आणि ईडीविरोधात घोषणाबाजी केली.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा