कोल्हापूर – आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा चालवणार्या रॅकेचा इचलकरंजीतून भांडाफोड करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजप नगरसेवक नितेश उर्फ गोट्या किरण पोवार यांच्यासह 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. भाजप नगरसेवक गोट्या किरण पोवार हा आमदार राहुल आवाडे यांचा कट्टर समर्थक असून तोच या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी पोलिस कोठडीत असलेल्यांना व गुरूवारी अटक केलेल्यांना न्यायालयात हजार केले असता या सर्वांना 30 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईमुळे इचलकरंजीसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या विशेष पथकाने 25 मे रोजी इचलकरंजी येथील एका फुटवेअर गोडाऊनवर छापा टाकून ही कारवाई केली. याप्रकरणी आतापर्यंत भाजप नगरसेवक नितेश पोवारसह 9 जणांना अटक करण्यात आली असून 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत तब्बल 60 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल, संगणक, आणि इतर साहित्य जप्त केले आहे. अमेय बडवे, गणेश पाटील, अभिजीत बडवे, उत्तमसिंग बग्गा, याकुब मुजावर, ऋषभ पाटील, नितेश उर्फ गोट्या किरण पोवार, मनिष सांगावकर, आणि सचिन हरगापुरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांच्या तपासामध्ये संशयित आरोपींच्या खात्यामध्ये 50 ते 60 लाख रुपयांचे अनेक व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहेत. यामध्ये कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन आवक-जावक झाली आहे. शहराबरोबरच कोल्हापूरमधील काही लोक यामध्ये सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे.
या सट्टेबाजीबाबत पोलिसांना महिनाभरापूर्वीच भनक लागली होती. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या संपूर्ण रॅकेटची पडताळणी केली. या रॅकेटमध्ये किती जणांचा आणि कोण शामिल आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या दोन पथकाने जवळपास एक महिना गुप्त पाळत ठेवली आणि सर्व माहिती गोळा केली. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या विशेष पथकाने 25 मे रोजी आयपीएल सामन्यादरम्यान छापा मारला.
या कारवाईत पोलिसांनी आधी 6 आरोपींना अटक केली होती, तर आता आणखी 3 जणांच्या मुसक्या आवळल्या आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये एकूण 17 जणांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या सहा संशयित आरोपींची बँक खाती गोठविण्याचे पत्र पोलिसांनी बँकेला दिले आहे. तसेच गुरूवारी अटक केलेल्यांची खातीही गोठविण्याचे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आता त्यांच्या खात्यावर कोणताही व्यवहार होणार नाही.
अटक करण्यात आलेल्या आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ‘पार्क 247.काॅम’ आणि ‘पार्क 333.काॅम’ या बेकायदेशीर वेबसाईटच्या माध्यमातून ग्राहकांना आयडी आणि पासवर्ड पुरवून आयपीएल सामन्यांवर बेटिंग जुगार खेळण्यासाठी प्रोत्साहन देते होते. अशी माहिती देखील पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आली आहे.
पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत आरोपींकडून पोलिसांनी 4.20 लाखांचे 9 मोबाईल, 15 हजारांचा लॅपटॉप, 70 हजार 230 रुपये रोख, 54 लाखांच्या 3 आलिशान गाड्या असा एकून 59 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तपासात तब्बल 100 हून अधिक जण रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचे राजस्थान कनेक्शनही समोर आले आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






